29 30 ​ 31 32
33 Border Animation 34
35 ​ 36 37 ​ -->

"शिक्षण आणि आपण" या ब्लॉग वर सर्व शिक्षणप्रेमींचे स्वागत आहे..

लवकरच आपल्या ब्लॉगवर सुरु होत आहे विद्यार्थ्यांसाठी ONLINE TEST, तसेच पालकांसाठी खास घरचा अभ्यास...

Saturday 5 September 2020

 आज शिक्षक दिनानिमित्त छान छान गोष्टी या भागात  

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

यांना आठवताना...

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन असतो आणि त्यांचा जन्मदिन देशभरात ‍शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस....याच निमित्ताने हा विशेष लेख...

शिक्षक’ हेच भावी पिढीचे शिल्पकार ...

`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`

भारतीय संस्कृती ही आदर्श संस्काराची शिदोरी आहे. यामध्ये गुरुंचा सन्मान अग्रभागी आहे. म्हणूनच गुरुला ब्रह्मदेवाची उपमा दिली जाते. कारण ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तशी गुरुने ज्ञानाची निर्मिती केली आहे. शिक्षक हा समाजाचा निर्माणकर्ता आहे असे आपण मानतो. विद्यार्थ्यांना देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षक करतात...

'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच विद्यार्थ्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सुध्दा विद्यार्थ्यांमध्ये रमणे आवडायचे कारण त्यांच्याकडून येणाऱ्या कल्पना, त्यांची जिद्द विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असे. आणि म्हणूनच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर रोजी येणारा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री शिक्षकांविषयी आपली भूमिका मांडताना सांगतात की, मातीच्या गोळ्याला आकार देणाऱ्या सर्जनशील हातांप्रमाणे शिक्षक मुलांना आकार देत असतात. राष्ट्र उभारणीचे काम शिक्षक मंडळी करत असून शिक्षक दिवस तुम्हा सर्व शिक्षकमंडळीचा आदर सन्मान करण्यासाठीचा आहे. आज विद्यार्थ्यांचे पालक जरी आपल्या मुलांना चांगली शिक्षण देत असले तरी शिक्षक हा संपूर्ण समाजाचा पालक असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाचे एक महत्त्व आहे. शिक्षणाच्या जोरावरच आपल्याला विकास आणि प्रगती करता येते. आज प्रत्येक पालकाची इच्छा असते की, आपली मुले शिकवीत, मोठी व्हावीत, त्या मुलाने प्रगती करावी. पण आजच्या शिक्षकाने माणूस घडवणारे शिक्षण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांना शिक्षणातून नेमके काय दिले पाहिजे याचे निकष निश्चित करण्यात आले असल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी अश्या तिघांचेही उत्तरदायित्व वाढले आहे. आजचा काळ पाहता, शिक्षकांकडे माहितीचा खजिना असणे किंवा शिक्षकांनी अपडेट असणे आवश्यक आहे. शिक्षक एक विद्यार्थी नाही तर समाज घडवत असतो, म्हणूनच शिक्षकाला समाजात असामान्य महत्त्व आहे. गुरु शिष्याच्या नात्याला महत्त्व असून माझ्या मते शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे आणि शिक्षण हाच विकासाचा मंत्र आहे आणि यात शिक्षकांची भूमिका मोलाची आहे.

आज चहुबाजूंनी माहितीचा प्रचंड स्फोट होत आहे. नवा इतिहास घडत आहे. भौगोलिक बदल होत आहेत. वैज्ञानिक शोध लागत आहेत. थोडक्यात सामाजिक ऐतिहासिक, वैज्ञानिक, भौगोलिक असे परिवर्तन जागतिक पातळीवरच होत आहे. त्याची माहिती शिक्षकाने वेळावेळी करून घेणे गरजेचे आहे. पूर्वीचा विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी यात खूप फरक पडत चालला आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षक जे सांगेल तेच खरे ज्ञान अशी परिस्थिती होती. कोऱ्या करकरीत मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम आई, वडील, शिक्षक करीत असत. आज विद्यार्थ्यांच्या मनाची पाटी कोरी नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दूरदर्शन, वर्तमानपत्रे, चित्रपट, नाटके, जाहिराती, मासिके, संगणक, मोबाईल आणि भोवतालचा परिसर यातून विद्यार्थी शिक्षकांच्या आधीच प्रचंड माहिती मिळवतो. आणि त्यामुळेच शिक्षकाचे कार्य आज खरोखरच अवघड बनत चालले आहे.

एखादी नवीन निर्मिती करणे जितके सोपे; तितके जुन्याची मोडतोड करून चांगले काही बनवणे अवघड असते. म्हणून विद्यार्थ्याला माहीत नसते, ते सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे तर त्याच्याजवळील माहितीच्या साठ्याचा त्याने कसा उपयोग करून घ्यावयाचे मार्गदर्शन करून; त्याला योग्य मार्गाने आचरण करायला लावणे; म्हणजे शिक्षण. आज शिक्षक केवळ वर्गात शिकवणारी, अभ्यासक्रम पूर्ण करणारी व्यक्ती न राहता विद्यार्थ्यांच्या व्यकिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाला मदत करणारी जबाबदार व्यक्ती बनेल तेव्हाच तो उत्कृष्ट शिक्षक ठरेल.

लेखिका: वर्षा फडके

माहिती स्रोत: महान्युज

No comments: