29 30 ​ 31 32
33 Border Animation 34
35 ​ 36 37 ​ -->

"शिक्षण आणि आपण" या ब्लॉग वर सर्व शिक्षणप्रेमींचे स्वागत आहे..

लवकरच आपल्या ब्लॉगवर सुरु होत आहे विद्यार्थ्यांसाठी ONLINE TEST, तसेच पालकांसाठी खास घरचा अभ्यास...

Monday 28 September 2020

 छान छान गोष्टी - भाग १०

गरज सरो, वैद्य मरो


 एकदा एका श्रीमंत माणसाचा एकुलता एक मुलगा खूप आजारी पडला.
 तऱ्हेतऱ्हेचे वैद्य केले. साधू संतांचे उपाय केले, तरी उतार पडेना.
 शेवटी एक विद्वान वैद्य त्याचेकडे आला. त्याने मुलाला तपासले व बरे करण्याची हमी दिली. 
तेव्हा त्या श्रीमंताने वैद्यराजांना सांगितले, "वैद्यराज! माझ्या मुलाला काही करून बरे करा. 
तुम्ही जर माझ्या मुलाला बरे केलेत तर माझी सर्व इस्टेट मी तुम्हाला देईन." 
वैद्यराजांनी खूप मेहनत करून एका महिन्यात त्याच्या मुलाला पूर्ण बरे केले आणि
 त्या श्रीमंतास आपले वचन पाळण्यास सांगितले. आता तो गृहस्थ बदलला.
 वैद्याला म्हणाला, "वैद्यराज! भलतेच काय मागता? आपणाला वेड तर लागले नाही ना! 
अहो, त्रासलेला माणूस असे बोलून जातो, ते सगळे खरे मानायचे असते का?
 माझ्या मुलाची स्थिती पाहून मी त्यावेळी वेडा झालो होतो आणि
 त्या वेडाच्या भरात मी आपणास भलतेच काही कबूल केलेही असेल.
 पण वेडेपणात दिलेले वचन शहाणपणात पाळायचे नसते."
 त्याने त्या वैद्याला काहीही दिले नाही.

तात्पर्य : जगात माणसे गरजेपुरते काहीही कबूल करतात. गरज सरली, की सोयीस्करपणे बदलतात.

Wednesday 23 September 2020

छान छान गोष्टी - भाग ९ 

संगत 

 एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले.

 गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता.
 त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत.
 मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या."
 गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना.
 शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला.
 गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या.
 गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले.
 पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती.
 त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला,
 पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!

तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. 
            काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.

Tuesday 15 September 2020

छान छान गोष्टी - भाग ८

पोपट आणि पिंजरा 

एका श्रीमंत माणसाजवळ एक पोपट होता. त्या पोपटास त्याने एका मोठय़ा व सुंदर पिंजर्‍यात ठेवले होते. 
तो त्याला चांगली फळे खायला घालीत असे. त्या पोपटाला तेथे सर्व सुखे अनुकूल होती, तरी ही तो मनात नेहमी झुरत असे.
 'माझे जातभाई जसे मोकळेपणे या जंगलातून त्या जंगलात जातात अन् या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात.
 तसे मला करायला मिळाले तर किती बरे होईल.' 
एके दिवशी चुकून पिंजर्‍याचे दार उघडे राहिल्याने त्या पोपटाची इच्छा पूर्ण झाली.
 या पिंजर्‍यातून पोपट घाईने बाहेर पडून लांबच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला.
 थोड्या वेळाने त्याला भूक लागली. 
तेव्हा इकडे तिकडे पाहू लागला. चमचमाट, ढगांचा आवाज होऊन पाऊस पडायला लागला.
 त्या बिचार्‍या पोपटाचे फारच हाल झाले. अशा गोष्टीची त्याला कधीच सवय नव्हती.
 शेवटी पावसात भिजून व थंडीने काकडून त्याचे तेथेच प्राण गेले.
 मरता मरता तो म्हणाला. 'मला जर पुन्हा त्या पिंजर्‍यात जाता आले, तर त्यातून बाहेर पडण्याची मी पुन्हा इच्छा कधीही करणार नाही.'

तात्पर्य : ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान.

Wednesday 9 September 2020

छान छान गोष्टी - भाग ७ 

 घामाचा पैसा
धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.


Tuesday 8 September 2020

छान छान गोष्टी - भाग ६ 

काय भुललासी वरलिया रंगा ..........  

एक उंदराचे पिटुकले पिल्लु पहिल्यांदा आपल्या बिळातून बाहेर पडले होते, ते थोडा वेळ इकडेतिकडे फिरून पुनः बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, ‘आई, ज्या या लहानशा जागेत तू मला लहानाचे मोठे केलेस, ती जागा सोडून आज मी अंमळ बाहेर जाऊन आले. तेथे मी जी मौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले; त्यापैकी एक प्राणी फार गडबडया स्वरूपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबडया रंगाचा तुरा होता. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हलवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात होतो, इतक्यात त्याने आपले दोन्ही हात हलविले आणि असा काही कर्कश शब्द केला की, त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या.

आता दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून, त्याचे एकंदर वर्तन असे होते की त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे मला वाटल्याशिवाय राहिले नाही. ’ हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, ‘वेडया पोरा ! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पहिल्याने पाहिलास व ज्याचा शब्द ऐकून तुला इतके भय वाटले, तो बिचारा कोंबडा अगदी निरुपद्रवी असून, एखादे वेळी त्याच्या मांसाचा थोडा तरी भाग आपणास मिळण्याचा संभव आहे; पण रेशमासारख्या मऊ अंगाचा जो दुसरा प्राणी तू पाहिलास ते दुष्ट लबाड आणि क्रूर मांजर असून, उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव. ’
"बाह्य देखावा आणि सौंदर्य यांवरून माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही".

Monday 7 September 2020

 छान छान गोष्टी - भाग ५ 
खरी नक्कल
भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला.
 
त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.
भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला.
दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला.
त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’
बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’
बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या.
x

छान छान गोष्टी - भाग ४  

न संपणारी गोष्ट

एका राजकन्येला गोष्टी ऎकण्याचा भलताच छंद लागला. कुणालातरी तिच्या जवळ बसून सतत गोष्ट सांगत रहावे लागे. परंतू गोष्ट संपली रे संपली की तिला अस्वस्थता वाटायला लागे !
 
अखेर एकदा राजाने जाहीर केले, 'जो मनुष्य आतापासून, ते थेट राजकन्येचा विवाह होऊन ती सासरी जाईपर्यंत तिला तिच्या मोकळ्या वेळेत एक न संपणारी गोष्ट सांगत राहील, त्याला मासिक एक हजार सुवर्ण मोहोरांचे वेतन दिले जाईल.'
राजाने राज्यात पिटवलेली ही दवंडी ऎकून राज्यातलेच नव्हे, तर इतर राज्यातलेही अनेकजण तिला गोष्ट सांगण्यासाठी राजवाड्यात आले. पण ताणून ताणून कुणी आपली गोष्ट महिन्या-दोन महिन्यांपेक्षा जास्त ताणू शकला नाही.
एके दिवशी एकजण राजवाडयावर आला व त्याने अशी न संपणारी गोष्ट राजकन्येला सांगण्याची आपली तयारी असल्याचे राजाला सांगितले. राजाने त्याची बसण्याची व्यवस्था केली. थोड्याच वेळात राजकन्या त्याच्यासमोर येऊन बसली आणि त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली.-
'एक होते भातगाव नावाचे गाव. त्या गावात आठ मैल लांबीचे, चार मैल रुंदीचे आणि दोन मैल उंचीचे, भातानी भरलेले प्रचंड मोठे कोठार होते. त्या भाताच्या अवाढव्य कोठारामुळेच त्या गावाला 'भातगाव' हे नाव पडले होते.'
शेजारी दुसरे गाव होते. तिकडे चिमण्याच चिमण्या होत्या. म्हणून त्या गावाचे नाव 'चिमणपूर' असे पडले होते.'
राजकन्या उत्साहानं म्हणाली, 'अय्या ! मोठी मजेशीर आहे नाही का ही गोष्ट. पण इतकी मजेशीर असलेली ही गोष्ट न संपणारी आहे ना ?'
गोष्ट सांगणारा म्हणाला, 'न संपणारी आहे, म्हणून तर मी आपल्याला सांगायला आलोय ना? पण कलावती राजे ! आपण आता मध्येच बोलू नका. मी सांगतोय ती गोष्ट निमूटपणे ऎका.'
याप्रमाणे बोलून तो गोष्ट सांगणारा पुढे म्हणाला, 'एकदा काय झालं? कशी कोण जाणे, पण भातगावच्या त्या भाताने भरलेल्या कोठाराची चिमणपूरच्या एका चिमणीला बातमी मिळाली ! ती उडत उडत त्या भातगावच्या कोठारापाशी आली त्या कोठाराला पडलेल्या फ़टीतून आत शिरली. तिनं त्या कोठारातला भाताचा एक दाणा चोचीत धरला आणि ती चिमणपूरला उडून गेली !
'सुहास्यवदनाने चोचीतून दाणा घेऊन घरट्याकडे जाणा-या त्या चिमणीला पाहून दुसरी चिमणी म्हणाली, 'चिमूताई ! चिमण्यांच्या अफ़ाट संख्यावाढीमुळे गावात अनेक चिमणे चिमण्या अन्नान्न करुन मरत असताना, तू आंबेमोहरी भाताचा हा टपोरा दाणा कुठुन ग आणलास?' त्या चिमणीनं खर ते सांगून टाकताच दुसरी चिमणी त्या कोठाराकडे गेली व आत शिरुन त्यातला एक दाणा घेऊन स्वगृही गेली!'
'अय्या ! किती बहारदार त-हेनं सांगता हो ? सांगा सांगा. पुढं काय झालं ते सांगा.' राजकन्या उत्कंठेनं म्हणाली.
'पुढं काय सांगायचं ? जे व्हायचं होतं ते झालं ! तिसरी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. चौथी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. पाचवी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. अकरावी चिमणी आली, दाणा घेऊन गेली .. बत्तीसावी... सत्तरावी....एकशे एकावी चिमणी आली, दाणा घेऊन गेली !'
सहनशीलतेचा अंत होऊन राजकन्या म्हणाली, 'किती च-हाट लावता हो ? कधी संपणार हे तुमचं च-हाट?'
गोष्ट सांगणारा म्हणाला, 'त्या प्रचंड कोठारातलं धान्य संपेपर्यंत, ते संपूण गेल्याशिवाय मला पुढची गोष्ट सांगताच येणार नाही.'
राजकन्या म्हणाली, 'मग त्या कोठारातलं धान्य संपवायलाच तुम्ही दहा वर्षे घ्याल.'
गोष्ट सांगणारा म्हणाला, 'कलावती राजे, तुमचं लग्न होऊन तुम्ही सासरी जाईपर्यंत तरी काही त्या कोठारातलं धान्य संपून जाण्याची शक्यता नाही.'
यावर राजकन्या राजाकडे गेली व म्हणाली, ' मला आजची गोष्ट ऎकत असता, एकंदरीत 'गोष्ट' या गोष्टीचा एवढा वीट आला आहे की, यापुढे मला कुणी गोष्ट सांगू नये, आणि मी ती ऎकू नये, असं वाटू लागलंय !'

गोष्ट सांगणा-याने सुरु केलेल्या गोष्टीचे स्वरुप राजाने राजकन्येकडून समजावून घेतले. तो मनात म्हणाला, ' गोष्ट सांगणा-याने बनवले असले, तरी त्या च-हाटदार गोष्टीमुळेच वीट येऊन, आपल्या कन्येचा एक अतिरेकी छंद सुटला.' राजाने या गोष्टीचा आनंद मानला, आणि न संपणारी गोष्ट सांगायला आलेल्या त्या माणसाला त्यानंतर त्याने गोष्ट न सांगताही, मासिक एक हजार मोहोरांचे वेतन सुरु केले.


Saturday 5 September 2020

 आज शिक्षक दिनानिमित्त छान छान गोष्टी या भागात  

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

यांना आठवताना...

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन असतो आणि त्यांचा जन्मदिन देशभरात ‍शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस....याच निमित्ताने हा विशेष लेख...

शिक्षक’ हेच भावी पिढीचे शिल्पकार ...

`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`

भारतीय संस्कृती ही आदर्श संस्काराची शिदोरी आहे. यामध्ये गुरुंचा सन्मान अग्रभागी आहे. म्हणूनच गुरुला ब्रह्मदेवाची उपमा दिली जाते. कारण ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तशी गुरुने ज्ञानाची निर्मिती केली आहे. शिक्षक हा समाजाचा निर्माणकर्ता आहे असे आपण मानतो. विद्यार्थ्यांना देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षक करतात...

'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच विद्यार्थ्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सुध्दा विद्यार्थ्यांमध्ये रमणे आवडायचे कारण त्यांच्याकडून येणाऱ्या कल्पना, त्यांची जिद्द विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असे. आणि म्हणूनच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर रोजी येणारा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री शिक्षकांविषयी आपली भूमिका मांडताना सांगतात की, मातीच्या गोळ्याला आकार देणाऱ्या सर्जनशील हातांप्रमाणे शिक्षक मुलांना आकार देत असतात. राष्ट्र उभारणीचे काम शिक्षक मंडळी करत असून शिक्षक दिवस तुम्हा सर्व शिक्षकमंडळीचा आदर सन्मान करण्यासाठीचा आहे. आज विद्यार्थ्यांचे पालक जरी आपल्या मुलांना चांगली शिक्षण देत असले तरी शिक्षक हा संपूर्ण समाजाचा पालक असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाचे एक महत्त्व आहे. शिक्षणाच्या जोरावरच आपल्याला विकास आणि प्रगती करता येते. आज प्रत्येक पालकाची इच्छा असते की, आपली मुले शिकवीत, मोठी व्हावीत, त्या मुलाने प्रगती करावी. पण आजच्या शिक्षकाने माणूस घडवणारे शिक्षण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांना शिक्षणातून नेमके काय दिले पाहिजे याचे निकष निश्चित करण्यात आले असल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी अश्या तिघांचेही उत्तरदायित्व वाढले आहे. आजचा काळ पाहता, शिक्षकांकडे माहितीचा खजिना असणे किंवा शिक्षकांनी अपडेट असणे आवश्यक आहे. शिक्षक एक विद्यार्थी नाही तर समाज घडवत असतो, म्हणूनच शिक्षकाला समाजात असामान्य महत्त्व आहे. गुरु शिष्याच्या नात्याला महत्त्व असून माझ्या मते शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे आणि शिक्षण हाच विकासाचा मंत्र आहे आणि यात शिक्षकांची भूमिका मोलाची आहे.

आज चहुबाजूंनी माहितीचा प्रचंड स्फोट होत आहे. नवा इतिहास घडत आहे. भौगोलिक बदल होत आहेत. वैज्ञानिक शोध लागत आहेत. थोडक्यात सामाजिक ऐतिहासिक, वैज्ञानिक, भौगोलिक असे परिवर्तन जागतिक पातळीवरच होत आहे. त्याची माहिती शिक्षकाने वेळावेळी करून घेणे गरजेचे आहे. पूर्वीचा विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी यात खूप फरक पडत चालला आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षक जे सांगेल तेच खरे ज्ञान अशी परिस्थिती होती. कोऱ्या करकरीत मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम आई, वडील, शिक्षक करीत असत. आज विद्यार्थ्यांच्या मनाची पाटी कोरी नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दूरदर्शन, वर्तमानपत्रे, चित्रपट, नाटके, जाहिराती, मासिके, संगणक, मोबाईल आणि भोवतालचा परिसर यातून विद्यार्थी शिक्षकांच्या आधीच प्रचंड माहिती मिळवतो. आणि त्यामुळेच शिक्षकाचे कार्य आज खरोखरच अवघड बनत चालले आहे.

एखादी नवीन निर्मिती करणे जितके सोपे; तितके जुन्याची मोडतोड करून चांगले काही बनवणे अवघड असते. म्हणून विद्यार्थ्याला माहीत नसते, ते सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे तर त्याच्याजवळील माहितीच्या साठ्याचा त्याने कसा उपयोग करून घ्यावयाचे मार्गदर्शन करून; त्याला योग्य मार्गाने आचरण करायला लावणे; म्हणजे शिक्षण. आज शिक्षक केवळ वर्गात शिकवणारी, अभ्यासक्रम पूर्ण करणारी व्यक्ती न राहता विद्यार्थ्यांच्या व्यकिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाला मदत करणारी जबाबदार व्यक्ती बनेल तेव्हाच तो उत्कृष्ट शिक्षक ठरेल.

लेखिका: वर्षा फडके

माहिती स्रोत: महान्युज

Friday 4 September 2020

छान छान गोष्टी - भाग २ 

चतूर न्यायमूर्ती 



Thursday 3 September 2020